अभिजितआबांनी धाराशिव साखर कारखान्यात बायोगॅस प्रकल्प केला सुरू

 0
अभिजितआबांनी धाराशिव साखर कारखान्यात बायोगॅस प्रकल्प केला सुरू

पंढरपूर – धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात बायोगॅस व सीएनजी चे उत्पादन सुरू झाले असल्याचे कारखान्याचे प्रमुख अभिजित पाटील यांनी माहीती दिली.
धाराशिव साखर कारखाना नेहमी चर्चेत आणि नवनवीन उपक्रम राबवून सामाजिक कार्यात पुढाकार घेणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये इथेनॉल प्लांट बंद करून देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प याच धाराशिव साखर कारखान्यामध्ये यशस्वीरित्या उभारण्यात आला होता. ज्याचे कौतुक देशपातळीवर झाले होते.  आता काळाची गरज ओळखून बायो-सीएनजी गॅसचे उत्पादन कारखाना प्रशासन घेत आहे.
धाराशिव कारखान्यातील आसवनी प्रकल्पातू स्पेंट वॉशपासून बायोगॅसची निर्मिती होत आहे. एका दिवसाला जवळपास वीस क्युबिक मे. टन बायोगॅस उत्पादित होवून यात जवळपास 10 मॅट्रिक टन सीएनजी उत्पादनाचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. बॉयलरला बायोगॅस दिल्याने बगॅसची बचत होत आहे. त्यातूनच पर्यावरणपुरक व प्रदुषणमुक्त वातावरण निर्माण होत असल्याचे अभिजित पाटील यांनी बोलताना सांगितले.
यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, शिवसेनेचे नेते आतिश पाटील, पंढरपूर बार असोशिएशन अध्यक्ष अ‍ॅड. अर्जुन पाटील, कारखान्याचे सरव्यवस्थापक आयुबखान पठाण, अभियंता देशमुख, प्रवीण बोबडे, बाबासाहेब वाडेकर, पेठे, दयानंद गव्हाणे, आसवनी व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर कोळगे यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

विठ्ठल कारखान्यातही बायो सीएनजी ची उभारणी


"अभिजित पाटील अध्यक्ष असणार्‍या पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी होत असून याचे भूमिपूजन नुकतेच राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यातून कारखान्याला आर्थिक फायदा व रोजगार निर्मिती होणार आहे. अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्यावर असा प्रकल्प आणण्यापूर्वी धाराशिव कारखान्यात याचा प्रयोग केला आहे. तेथील बायोगॅस प्रकल्प आता सुरू झाला आहे. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी  साखर कारखान्यात पुढील आठ महिने ते एक वर्षात बायो सीएनजी चा प्रकल्प सुरू होईल."

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow