वंध्यत्वावरील उपचारासाठी इंट्रायुटेरिन इन्सेमिनेशन (आय.यु.आय.) प्रक्रिया

 0
वंध्यत्वावरील उपचारासाठी इंट्रायुटेरिन इन्सेमिनेशन (आय.यु.आय.) प्रक्रिया

तुम्ही ‘कृत्रिम गर्भाधान’ ह्याबद्दल ऐकलेच असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की हे आधुनिक तंत्रज्ञान आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की हे तंत्रज्ञान १८व्या शतकापासून प्रचलित आहे? होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. जरी हे तंत्रज्ञान खूप विकसित झाले असले तरी त्यामागची मुलभूत पद्धत सारखीच आहे.  इंट्रायुटेरिन इनसेमिनेशन (आय.यु.आय.) ही वंध्यत्वावरील उपचारपद्धतींमधील एक चांगली उपचार पद्धती आहे आणि त्यामुळे स्त्रियांना गर्भधारणा होण्यास मदत होते.

आय.यु.आय. काय आहे?

आय.यु.आय. किंवा इंट्रायुटेरिन इनसेमिनेशन ही कृत्रिम गर्भाधानाची उपचारपद्धती आहे आणि सध्या ही उपचारपद्धती खूप प्रसिद्ध आहे. आय.यु.आय. उपचारपद्धतीमध्ये चांगले शुक्रजंतू हे आळशी आणि हालचाल न करण्याऱ्या शुक्रजंतूंपासून वेगळे केले जातात आणि हे चांगले निरोगी शुक्रजंतू गर्भाशयात सोडले जातात. ह्या प्रक्रियेत वापरले जाणारे शुक्रजंतू हे तुमच्या पतीच्या किंवा दात्याच्या शुक्रजंतूंची शुद्ध आवृत्ती आहे. कृत्रिम गर्भाधान हे एकट्या स्त्रिया किंवा महिला जोडप्यांसाठी किंवा ज्यांना मूल होण्यास त्रास होत आहे अशा जोडप्यांसाठी फायदेशीर आहे. खालील परिस्थितीतील लोकांसाठी ही पचारपद्धती वापरली जाऊ शकते:

 • वंध्यत्वाचा प्रश्न असलेली जोडपी.
 • एकटी स्त्री किंवा समलिंगी जोडपी ज्यांना वंध्यत्वाचा त्रास नाही परंतु बाळ हवे आहे.
 • शारीरिक व्यंग किंवा मानसिक समस्यांमुळे ज्या जोडप्याना संभोग करता येत नाही.
 • वैद्यकीय कारण असलेल्या जोडप्यांना गर्भधारणेसाठी मदत व्हावी म्हणून, जसे की जर जोडीदार एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह असेल आणि त्यामुळे बाळाला आणि आईला ह्या रोगाचा संसर्ग होणार असेल तर ही उपचारपद्धती वापरली जाते.

ह्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आय.यु.आय. किंवा इंट्रायुटेरिन इनसेमिनेशन आणि आय.व्ही. एफ. किंवा इनव्हिट्रो फर्टिलायझेशन ह्या दोन्ही उपचारपद्धती सारख्या नाहीत. ज्या स्त्रियांना वंध्यत्वाचे गंभीर प्रश्न नाहीत अशा स्त्रियांसाठी आय.यु.आय. ही उपचारपद्धती परिणामकरीत्या कार्य करते.

आय.यु.आय. दरम्यान चांगल्या गुणवत्तेच्या शुक्रजंतूंची निवड केली जाते, ते विलग केले जातात आणि संभोगाऐवजी (जिथे ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या केली जाते) कृत्रिमरीत्या गर्भाशयात सोडले जातात. नंतर मग शुक्रजंतू आणि अंड्याचे नैसर्गिकरित्या फलन होते. आय.व्ही.एफ.च्या तुलनेत आय.यु.आय. कमी आक्रमक आणि कमी खर्चिक असते. एकदा आय.यु.आय. करण्यासाठी लागणारा खर्च (खाली सप्ष्टीकरण दिले आहे) हा आय.व्ही.एफ.साठी येणाऱ्या खर्चाच्या एक चतुर्थांश इतका आहे!

गर्भधारणेसाठी इंट्रायुटेरिन इनसेमिनेशन पद्धती

आय.यु.आय. ह्या उपचारपद्धतीमुळे गर्भधारणा कशी होते? तर, त्यासाठी २ गोष्टींची गरज असते, पहिलं म्हणजे नैसर्गिकरित्या बीजवाहिनी मध्ये सोडलेले स्त्रीबीज आणि निरोगी शुक्रजंतू असलेला तुमच्या जोडीदाराचा किंवा दात्याच्या वीर्याचा नमुना. प्रत्येक उपचार किंवा आय.यु.आय. चा प्रयत्न ह्यास ‘आय.यु.आय. चे एक चक्र’ म्हणतात: म्हणजेच ओव्यूलेशनच्या पहिल्या दिवसापासून, गर्भाधान आणि साधारण पणे १५ दिवसांनंतरचा  (जेव्हा यश तपासून पाहण्यासाठी गर्भधारणा चाचणी करून पहिली जाते) काळ.

वंध्यत्वावरील उपचारांसाठी आय.यु.आय.ची प्रक्रिया

१. आय.यु.आय. कसे कार्य करते?

खाली आय.यु.आय.ची प्रक्रिया सविस्तर दिली आहे:

 • स्त्रीबीजांची निर्मिती

नैसर्गिकरित्या किंवा औषधांनी प्रेरित करून, निर्मित झालेले स्त्रीबीज हे आय.यु.आय. साठी महत्वाचे आहेत. स्त्रिया सामान्यतः महिन्याला एक स्त्रीबीज सोडतात आणि अशा प्रकरणांमध्ये एकापेक्षा जास्त निरोगी स्त्रीबीज निर्मिती साठी औषधे दिली जातात त्यामुळे फलनाची शक्यता वाढते.

 • स्त्रीबीजांवर लक्ष ठेवणे

स्त्रीबीजांवर लक्ष ठेवणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे, कारण त्यानुसार गर्भाधानाची वेळ नीट ठरवणे सोपे जाते आणि ह्या उपचारपद्धतीच्या यशासाठी हा महत्वाचा घटक आहे.

 • योग्य शुक्रजंतू निवडून त्यांना धुवून स्वच्छ करणे

जोडीदाराकडून किंवा शुक्रजंतू दात्याकडून मिळालेला नमुना स्वच्छ केला जातो. असे केल्याने चांगल्या गुणवत्तेचे शुक्रजंतू कमी द्रव्यामध्ये मिळतात

 • रुग्णास गर्भाधान करणे

एक लांब आणि पातळ नळी ज्यास कॅथेटर म्हणतात, ज्याच्या आधारे ‘स्वच्छ’ शुक्रजंतू गर्भाशयात सोडले जातात.

 • यशासाठी चाचणी करून पाहणे

गर्भाधानानंतर २ आठवडयांनी प्रक्रिया यशस्वी झाली आहे किंवा कसे हे तपासून पाहण्यासाठी गर्भधारणा चाचणी करून बघितली जाते.

अ ) पुरुषांसाठी

ह्या प्रक्रियेत पुरुषांचा सहभाग म्हणजे त्यांच्या शुक्रजंतूंचे योगदान असते. त्यांना वेळोवेळी त्यांच्या निरोगी शुक्रजंतूंचा नमुना गर्भाधानासाठी द्यावा लागू शकतो. जर शुक्रजंतूंची संख्या, त्यांची हालचालींची क्षमता किंवा शुक्रजंतूंच्या आकारशास्त्राचा गुणांक जर कमी असेल तर इंट्रायुटेरिन इनसेमिनेशन  यशस्वी होणार नाही.

ब ) स्त्रियांसाठी

हे स्त्रियांसाठी सोपे नाही. त्यांना त्यांच्या मासिक पाळीवर आणि ओव्यूलेशन वर लक्ष ठेवावे लागते, तसेच त्यांना कधी औषधे घ्यावी लागतात आणि नैसर्गिक पद्धतीऐवजी एक लांब नळीद्वारे गर्भाधानाची प्रक्रिया त्यांना सहन करावी लागते. ४० पेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रियांमध्ये ह्या उपचार पद्धतीने यश मिळण्याची शक्यता खूप कमी असते.

२. आय.यु.आय ही उपचार पद्धती केव्हा वापरावी?

समलिंगी जोडप्यांसाठी किंवा ज्यांनी सरोगसीचा पर्याय निवडला आहे त्यांच्यासाठी ही उपचार पद्धती निवडली जाते.

 • वंध्यत्व
 • गर्भाशयात जखम किंवा इतर दोष
 • संभोग करण्यास असमर्थ असणारी जोडपी
 • स्खलन किंवा लिंगाच्या ताठरतेची समस्या
 • एच.आय.व्ही.चे रुग्ण
 • वीर्याची ऍलर्जी असलेली प्रकरणे

आय.यु.आय. ची प्रक्रिया वेदनादायी आहे का?

ही प्रक्रिया वेदनादायी वाटते पण ती तशी नाही. थोडंसं दुखल्याची तक्रार काही स्त्रिया करतात, परंतु बऱ्याच जणींना ते पॅप स्मिअरच्या वेळेला जशी अस्वस्थता वाटते तसे जाणवते.

३. यशस्वी आय.यु.आय. कशी कराल?

शुक्रजंतूंच्या गुणवत्तेसोबतच, कृत्रिम गर्भाधानाची वेळ सुद्धा महत्वाची आहे. गर्भाधानाच्या वेळेवर काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे कारण ते ओव्यूलेशनच्या थोडे आधी होणे गरजेचे आहे. इथे महत्वाची नोंद घेतली पाहिजे की ओव्यूलेशन नंतर स्त्रीबीज फक्त १२-२४ तास जिवंत असतात. त्यामुळे ह्या काळातच म्हणजेच स्त्रीबीजे जेव्हा जिवंत असतात तेव्हाच आय.यु.आय. केले पाहिजे. जर तुम्ही  वेळ अचूक पाळत असाल तर तुमच्या यशस्वी गर्भधारणेची शक्यता दुप्पट होते.

४. आय.यु.आय. चा यशस्वितेचा दर किती आहे?

आय.यु.आय.च्या यशाचा दर हा वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो जसे की, स्त्रीचे वय आणि वंध्यत्वाच्या कारणाचे अचूक स्वरूप माहित असणे इत्यादी. ज्या जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचे कारण माहित नसते अशा जोडप्यांमध्ये गर्भधारणेचा दर  ४-५% असतो. ज्या प्रकरणांमध्ये प्रजननासाठी औषधे दिली जातात तिथे ही शक्यता ७-१६% इतकी असते.

५. आय.यु.आय. नंतर लवकरात लवकर केव्हा गर्भधारणा चाचणी मी करू शकते?

आय.यु.आय. नंतर गर्भधारणा यशस्वीरीत्या झाली आहे किंवा कसे हे बघण्यासाठी २ आठवडे वाट पहिली पाहिजे, परंतु आय.यु.आय. च्या उपचारांनंतर गर्भधारणेची काही लक्षणे दिसत आहेत का ह्यावर लक्ष ठेवले पाहिजे.

६. आय.यु.आय. नंतर घ्यायवयाची काळजी

यशाची शक्यता वाढण्यासाठी तुम्ही आय.यु.आय. नंतर काही प्रमाणात नियंत्रण ठेऊ शकता. काही डॉक्टर्स आय.यु.आय. नंतर ५ दिवस संपूर्ण बेड रेस्ट चा सल्ला देतात त्यामुळे गर्भधारणेसाठी शरीराची ऊर्जा वाचवली जाते. खूप जास्त जड  व्यायाम टाळण्यास सांगितले जाते आणि त्यामुळे फक्त चालण्याचा व्यायाम सर्वात चांगला. सकारात्मक राहून यशस्वी गर्भधारणेचा तुम्ही विचार करत आहात ना ह्याची खात्री करा.

आय.यु.आय. साठी किती वेळ लागतो?

गर्भाधानाच्या प्रक्रियेस जास्त वेळ लागत नाही. त्यासाठी लागणारा वेळ हा फक्त २ मिनिटे असतो, परंतु त्यासाठी कराव्या लागणाऱ्या नियोजनास खूप वेळ लागतो. ओव्यूलेशन च्या आधी आठवडाभर औषधे दिली जातात. यशाची खात्री नसल्याने यश मिळण्यासाठी आय.यु.आय. एका पेक्षा जास्त वेळा करणे जरुरीचे असते. तरीही यश मिळाले नाही तर आय.व्ही.एफ. करण्याचा सल्ला दिला जातो. एक किंवा दोन वेळा आय.यु.आय. अयशस्वी झाल्यास आय.व्ही.एफ.चा सल्ला दिला जातो, विशेषकरून ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये हे जास्त आढळते.

आय.यु.आय. चे फायदे आणि तोटे

फायदे

 • ही प्रक्रिया ‘नैसर्गिक’ आहे, म्हणजेच शुक्रजंतू स्त्रीच्या शरीरात सोडले जातात आणि त्याचा संयोग स्त्रीबीजाशी नैसर्गिकरित्या होऊ दिला जातो.
 • आय.यु.आय. ही उपचारपद्धती आय.व्ही.एफ. पेक्षा कमी आक्रमक आहे.
 • ह्या उपचारपद्धतीस खर्च सुद्धा कमी येतो, म्हणजेच आय.व्ही.एफ. साठी लागणाऱ्या खर्चाच्या जवळजवळ १/४ कमी.
 • जर पुरुषांमध्ये समस्या असेल तर आय.यु.आय.खूप परिणामकारक ठरते.

तोटे

 • प्रक्रियेसाठी मिळणारा  वेळ खूपच कमी आहे. स्त्रीमध्ये स्त्रीबीज सोडले गेल्यावर लगेच डॉक्टरांना पूर्वसूचना दिली गेली पाहिजे आणि हा काळ फक्त २४-३६ तासांचा असतो.
 • आय.व्ही.एफ.च्या तुलनेत आय.यु.आय. च्या यशाचा दर खूप कमी आहे.
 • ४० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रियांसाठी हा पर्याय योग्य नाही.
 • आय.यु.आय.मुळे गर्भधारणेची खूप जास्त शक्यता असते आणि जुळे किंवा तिळे होण्याची शक्यता असते त्यामुळे गर्भारपणात धोका वाढतो.
 • यश मिळण्यासाठी  तुम्हाला अनेक वेळा आय.यु.आय. करावे लागते.

आय.यु. आय.मुळे कुठली गुंतागुंत होऊ शकते?

आय.यू.आय.च्या यशाचा दर खूप जास्त नाही आणि निरोगी शुक्रजंतूंना गर्भाशयात सोडल्यावर पुढची सगळी प्रक्रिया ‘नैसर्गिक’ असल्याने होणारी गुंतागुंत खूप जास्त नसते. परंतु, गर्भाशयात किंवा बीजवाहिन्यांमध्ये वीर्याच्या नमुन्याद्वारे, कॅथेटर किंवा अन्य साधनांमुळे संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया नावाजलेल्या दवाखान्यात केली पाहिजे जिथे स्वच्छतेविषयी जागरूकता आहे तसेच गर्भाधानाच्या आधी गर्भाशयाचे मुख स्वच्छ केले पाहिजे.

ज्या स्त्रिया आय.यु.आय. चा उपचार घेत आहेत त्यांच्यासाठी अजून एक चिंतेचा विषय म्हणजे एकापेक्षा जास्त गर्भ राहण्याची शक्यता असते म्हणजे जुळे, तिळे किंवा जास्त. एका पेक्षा जास्त गर्भ असल्यास त्यामुळे बाळ तसेच आईच्या तब्ब्येतीस धोक्याची शक्यता असते. अश्या बाळांचा अकाली जन्म होण्याची शक्यता असते. अश्या गर्भधारणेत खूप धोका असतो.

आय.यु.आय. ह्या उपचारपद्धतीला किती खर्च येतो?

आय.व्ही.एफ. च्या तुलनेत आय.यु.आय. ही उपचारपद्धती भारतात परवडते. एका वेळेला आय.यु.आय.करताना ३००० रुपये इतका खर्च येतो, हा खर्च तुम्ही ही उपचारपद्धती कुठून करून घेत आहात ह्यावर अवलंबून असतो. तथापि, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्या आणि औषधे ह्यांचा एकूण खर्च बघता तो ५०००-१०,००० रुपये इतका येऊ शकतो. जर शुक्रजंतूंसाठी तुम्ही दाता निवडला असेल तर खर्च वाढू शकतो.

आय.यु.आय. च्या बाबतीत घेतली पाहिजे अशी महत्वाची काळजी

इंट्रायुटेरिन इनसेमिनेशनची पद्धती जास्त गुंतागुंतीची नसते, काही गोष्टी तुम्ही मनात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे तुमच्या यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढेल. साधारणपणे जी १०-२०% जोडपी  आय.यु.आय.ची उपचारपद्धती निवडतात त्यांना एकदा आय.यु.आय. केल्यावर यश मिळते. आय.यु.आय. नंतर गर्भधारणेच्या लक्षणांवर लक्ष ठेवा.

आय.यु.आय. यशस्वी होण्यासाठी काही टिप्स

तुमच्या ताणाचे नीट व्यवस्थापन करा. जर गर्भधारणा झाली नाही तर स्त्रीला त्याचा खूप ताण येऊ शकतो आणि ध्यानधारणा किंवा दुसऱ्या एखाद्या माध्यमातून ताण कमी केल्यास त्याची मदत होऊ शकते.

 • तुम्ही पोषक आहार घेत आहात ह्याची खात्री करा.
 • तुमच्या आहारातील प्रथिने वाढवा.
 • मद्यपान किंवा धूम्रपान कमी करा.
 • कॅफेन चे प्रमाण कमी करा.
 • कफ पडणारे औषध (एक्सपेक्टोरंट) घ्या, त्यामुळे तुमच्या गर्भाशयाच्या मुखातील स्त्राव पातळ होतो आणि त्यामुळे शुक्रजंतू जिवंत राहण्यास मदत होते.
 • हलके व्यायाम करा. योग करण्याचा सल्ला दिला जातो.

आय.यु.आय. च्या यशस्वीतेच्या काही कथा

 • ‘अ’ म्हणते, ” आम्ही आधी औषधे (क्लोमीड) घेतली. त्यास अपयश आले. त्यामुळे आम्ही आय.यु.आय. चा विचार केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले! माझा असा सल्ला आहे की तुम्ही नीट संशोधन करून, चांगल्या रिप्रॉडक्टिव्ह एंडोक्रिनॉलॉजिस्ट ची निवड करा.ज्यांच्यासोबत तुम्हाला ही उपचारपद्धती घेताना तुम्हाला संकोच वाटणार नाही. तसेच तुमच्या सारख्याच केसेस हाताळण्याबाबत ते डॉक्टर सुप्रसिद्ध असतील. जेव्हा ही उपचारपद्धती आम्ही घेतली तेव्हा आमच्याकडे एकच स्त्रीबीज होते आणि त्या एका स्त्रीबीजाचे फलन झाले आणि ती आमची लाडकी लेक होय.”
 • ‘ब’ म्हणते, “आम्ही ३ वेळा आय.यु.आय.केले. तिसऱ्या वेळेला एकटोपीक प्रेग्नन्सी राहिली. आम्ही थोडा ब्रेक घ्यायचं ठरवलं. तीन वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकदा आय.यु.आय. करण्याचे ठरवले. आणि आम्हाला तीन बाळांचा गर्भ राहिला, एक बाळ जगू शकले नाही परंतु आम्हाला आता २ निरोगी बाळे आहेत”.
 • ‘क’ म्हणते, ” मला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम(पी.सी.ओ.एस.) चा प्रश्न होता. माझे डावे अंडाशय अजिबात काम करत नव्हते आणि माझी श्रोणी (पेल्वीस) सुद्धा थोडी एका बाजूला थोडी कलल्यासारखी आहे. आम्ही गर्भधारणेसाठी २ वर्षे प्रयत्न करत होतो. ८ वेळा प्रोव्हेरा आणि क्लोमीड ह्या औषधांचा कोर्स पूर्ण केला तसेच इंजेक्शने सुद्धा घेतली. त्यामुळे नंतर आम्ही आय.यु.आय.केले आणि गर्भधारणा झाली. ५व्या आठवड्यात मला रक्तस्त्राव सुरु झाला आणि १५ व्या आठवड्यापासून मला बेड रेस्ट सांगितली गेली. ३८ व्या आठवड्यात तात्काळ सिझेरिअन करेपर्यंत मला बेडरेस्ट होती. माझं गोंडस ‘आय.यु.आय.बेबी ‘ आता ५ वर्षांचे आहे अगदी निरोगी आणि परिपूर्ण!!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow