सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन 1 August | Gondavlekar Maharaj Pravachan

१ ऑगस्ट | आनंद कशामुळे मिळतो ? | #gondavalekar_maharaj_pravachan_today #gondavalekarmaharaj #dainikshodh

 0
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन  1 August | Gondavlekar Maharaj Pravachan

१ ऑगस्ट

आनंद कशामुळे मिळतो ?

सृष्टी शून्यापासून निर्माण झाली. आपलीही मूळ स्थिती तीच आहे, म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा; म्हणजेच, स्वानंदात स्वस्थ राहावे. पण ते आपल्या हातून होत नाही, कर्म करीतच राहावे असे वाटते. प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो; पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही, तर काय उपयोग ? याकरिता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावे. आनंद कुणाला नको आहे ? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळविण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही. नोकरी नको आणि खायला हवे, हे कसे शक्य आहे ? खरोखर, प्रपंचाच्या या अगणित उपाधींतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय. मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो; याकरिता, आपल्या इच्छेविरुद्ध घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही, इकडे पाहावे. याला एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणे. कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी, ही बुद्धीच ठेवू नये. जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे. महत्त्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये. भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे, आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्न करून जे काही होते, ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते. मागे घडलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येतो. तसेच उद्यांची काळजी करीत राहाणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो. होते-जाते हे सर्व भगवंताच्या इच्छेने होते, हे मनाने पक्के ठरविल्यावर मग विनाकारण काळजी का करावी ?

दु:ख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे, ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे, तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असताही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो; आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला, त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचित समजावे. भगवंतासाठी एकच दान खरे आहे, आणि ते म्हणजे आत्मदान होय. सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे.

२१४. वाणीने नाम घ्यावे व मनाने स्मरण करावे, आणि या दोन्हीचा मेळ असावा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow