भाजपा-राष्ट्रवादीच्या ‘होर्डिंग वॉर’मध्ये शिवसेनेची उडी; अजित पवार, फडणवीसांच्या शेजारी लागलं उद्धव ठाकरेंचं होर्डिंग

ठाकरे सरकारच पुण्याचा विकास करणार; अजित पवार, फडणवीसांच्या शेजारी लागलं उद्धव ठाकरेंचं होर्डिंग

भाजपा-राष्ट्रवादीच्या ‘होर्डिंग वॉर’मध्ये शिवसेनेची उडी; अजित पवार, फडणवीसांच्या शेजारी लागलं उद्धव ठाकरेंचं होर्डिंग

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असल्याने विविध आशयाचे मजकूर असलेले होर्डिंग लावण्यात आले होते. त्या होर्डिंग्सची चर्चा शहरात थांबत नाही तोवर आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेही यामध्ये उडी घेतली आहे. उद्धव ठाकरेंचा २७ जुलैला वाढदिवस असल्याने पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारचं करणार असे होर्डिंग शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत.

या होर्डिंगमुळे शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजपा आणि राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली आहे. तसंच यामुळे पुण्याचा विकास कोण करत आहे यावरुन आरोप प्रत्यारोपदेखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाचे नेते, कार्यकर्ते सोशल मीडियावर तसंच चौकाचौकात होर्डिंग लावून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याबाबत सांगायचे झाल्यास, 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते अजित पवार आणि भाजपाचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर होर्डिंग लावण्यात आले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीकडून कारभारी लयभारी, कर्तव्य प्रतिदक्ष प्रत्येक कामावर जातीने लक्ष, पुण्यनगरीचा विश्वास दादा म्हणजेच विकास तर भाजपाकडून विकास पुरुष असे होर्डिंग लावण्यात आले होते. या दोन्ही होर्डिंगची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यातच आता शिवसेनेने उडी घातल्याने चर्चेला उधाण आलं आहे.