अभ्यासावरुन रागावणाऱ्या आईची मुलीकडून हत्या, आत्महत्या केल्याचा बनाव

अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणाऱ्या आपल्या आईची पोटच्या मुलीनेच कराटेच्या कापडी पट्ट्याने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईतील ऐरोली, सेक्टर-7 मध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने हे कृत्य केलं आहे.

अभ्यासावरुन रागावणाऱ्या आईची मुलीकडून हत्या, आत्महत्या केल्याचा बनाव

नवी मुंबई : अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणाऱ्या आपल्या आईची पोटच्या मुलीनेच कराटेच्या कापडी पट्ट्याने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईतील ऐरोली, सेक्टर-7 मध्ये  राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने हे कृत्य केलं आहे. विशेष म्हणजे आपल्या आईची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी सदर मुलीने बेडरुमचा दरवाजा आतुन बंद करुन आईच्या मोबाईल फोनवरुनच आपल्या नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. 30 जुलै रोजी सदर घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मुलीचा प्रताप उघडकीस आणला.

घटनेतील मृत महिलेचे नाव शिल्पा जाधव (41) असे असून ती ऐरोली, सेक्टर-7 मधील राकेश सोसायटीत पती संतोष जाधव (44) आणि 15 वर्षीय मुलगी तसेच 6 वर्षाचा मुलगा यांच्यासह रहात होती. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे अशी शिल्पा जाधव आणि संतोष जाधव या दोघांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी तिला गत मे महिन्यापासून नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लास लावून दिला होता. या परीक्षेच्या अभ्यासामध्ये मुलीने सातत्य ठेवावे यासाठी आई शिल्पा जाधव कायम आपल्या मुलीवर दबाव आणत होती. त्यामुळे मुलीचे आपल्या आईसोबत अभ्यासावरुन नेहमी भांडण होत होते. 27 जुलै रोजी मुलीने मोबाईल घेतल्याने वडिलांकडून तिला ओरडा मिळाला होता. त्यामुळे ती रागावून जवळच राहणारे मामा शैलेश पवार याच्या घरी गेली होती.

त्यानंतर सायंकाळी आई आपल्या मुलीची समजूत काढण्यासाठी भावाच्या घरी गेली असताना मुलीचा आपल्या आईसोबत पुन्हा वाद झाला. या वादात मुलीने आई वडीलांविरोधात पोलिसात तक्रार करण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे आईने मुलीला रबाळे पोलीस ठाण्यात नेले होते. त्यावेळी रबाले पोलिसांनी मुलीची आणि तिच्या आई-वडिलांची समजूत काढून त्यांना घरी पाठवुन दिले होते. त्यानंतर 30 जुलै रोजी सकाळी या मुलीचे वडील घराबाहेर गेल्यानंतर घरामध्ये ती आई आणि लहान भावासह होती. यावेळी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आईने पुन्हा आपल्या मुलीला अभ्यासावरुन रागावून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आईने हातात सुरी घेतल्याने मुलीला आईचा राग आला. त्यामुळे तीने जोरदार प्रतिकार केला.

यावेळी आई आणि मुलगी या दोघींमध्ये झालेल्या झटापटीत आईने मुलीच्या डाव्या हाताच्या तळव्याला चावा घेतल्याने मुलीने आईला ढकलून दिले. त्यामुळे आई खाली पडून तिच्या डोक्याला बेडरुममध्ये असलेल्या बेड लागला. त्यामुळे आई अर्धमेली होऊन पडल्यानंतर तिने बेडवर पडलेला कराटेचा कापडी बेल्ट हातात घेण्याचा प्रयत्न केला. पण, मुलीनेच तो बेल्ट आपल्या हातात घेऊन आईच्या गळ्याभोवती घट्ट आवळून धरत तिची हालचाल बंद होईपर्यंत तसाच धरुन ठेवला. यानंतर आई मेल्याची खात्री झाल्यावरच तिने आईला सोडले.

आईची हत्या केल्यानंतर सदरचा प्रकार आत्महत्येचा वाटावा यासाठी मुलीने प्रथम बेडरुमच्या दरवाजाला बाहेरुन असलेली चावी काढून ती आईच्या बेडरुममध्ये ठेवली. त्यानंतर तिने आईचा मोबाईल घेऊन तिच्या व्हॉटस्अॅपवरुन वडील, मामा, मावशी यांच्या मोबाईलवर मी सर्व प्रयत्न केले, मी आपले आयुष्य संपवित आहे. अशा प्रकारचा इंग्रजीत मेसेज पाठवून बेडरुमचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर या मुलीने आपल्या वडिलांना फोन करुन आई बेडरुमचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे वडिलांनी जवळच राहणारा आपला मेव्हणा शैलेश पवार याला सांगितल्यानंतर त्याने तत्काळ बहिणीच्या घरी धाव घेऊन बेडरुमचा दरवाजा तोडल्यानंतर बेडरुममध्ये त्याला बहिण मृतावस्थेत पडल्याचे आणि तिच्या गळ्याभोवती कराटेचा कापडी पट्टा आवळल्याचे निदर्शनास आले.

सदर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शैला जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनात शैला जाधव यांचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि गळा आवळल्यामुळे झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तपास करण्यासाठी मृत शैला जाधव यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु केली. या चौकशीत पोलिसांनी मुलीला विश्वासत घेऊन तिच्याकडे याबाबत विचारपूस केली असता, तिनेच आईची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर रबाले पोलिसांनी स्वतः या प्रकरणात फिर्यादी होऊन मुलीवर हत्या आणि पुराव नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.