बॉयफ्रेण्डसोबत राहण्यासाठी पतीच्या हत्येची सुपारी, मंगळसूत्र गहाण ठेवून जमवले एक लाख

पोलिसांनी आरोपी पत्नी श्रुती गंजी, तिचा प्रियकर हितेश वाला, तिची मैत्रीण प्रिया आणि साथीदार संतोष यांना अटक केली आहे. तर अन्य दोघा जणांचा शोध सुरु आहे.

बॉयफ्रेण्डसोबत राहण्यासाठी पतीच्या हत्येची सुपारी, मंगळसूत्र गहाण ठेवून जमवले एक लाख

भिवंडी : भिवंडीतील ओला कार चालकाची पत्नीनेच प्रियकराच्या साथीने सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. या प्रकरणी आरोपी पत्नी, तिचा प्रियकर यांच्याशिवाय दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पतीची सुपारी द्यायला पैसे जमवण्यासाठी महिलेने मंगळसूत्रही गहाण ठेवल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर उभ्या असलेल्या एका कारमध्ये मृतदेह आढळल्याने चार दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती.

मंगळसूत्र गहाण ठेवून एक लाख

आरोपी श्रुती गंजी हिने मंगळसूत्र आणि इतर सोन्याचे दागिने गहाण ठेवून एक लाख रुपये जमवले होते, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. याशिवाय एफडी मोडून आणखी तीन लाख रुपये उभे करण्याचा तिचा इरादा होता. बॉयफ्रेण्डसोबत राहण्यासाठी पती प्रभाकर गंजीपासून श्रुतीला घटस्फोट घ्यायचा होता. मात्र पतीने त्यास विरोध केला होता. खुद्द प्रभाकरचेही अन्य महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला जातो.

पोलिसांनी आरोपी पत्नी श्रुती गंजी, तिचा प्रियकर हितेश वाला, तिची मैत्रीण प्रिया आणि साथीदार संतोष यांना अटक केली आहे. तर अन्य दोघा जणांचा शोध सुरु आहे. चौकशीदरम्यान श्रुतीच्या उत्तरांमध्ये पोलिसांना विसंगती आढळली. त्यामुळे त्यांनी कसून चौकशी केली असता, तिने पतीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली.

नेमकं काय घडलं?

भिवंडीहून ऐरोलीला जाण्यासाठी भाडोत्री मारेकऱ्यांनी टॅक्सी बूक केली होती. माणकोली नाक्याजवळ पोहोचल्यानंतर आरोपींनी खाद्यपदार्थ घेण्याच्या बहाण्याने टॅक्सी थांबवण्याची विनंती केली. त्याच वेळी नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. त्याला तिथेच सोडून तिघांनी पोबारा केला. आपल्या बोटांचे ठसे कुठेही सापडणार नाहीत, याची त्यांनी काळजी घेतली होती, मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करत अखेर गुन्हेगारांचा छडा लावला.