भाज्या खरेदीसंबंधी टिप्स:

आपण जेव्हा भाज्या खरेदी करायला जातो तेव्हा बऱ्याच जणांना चांगली भाजी कशी निवडावी यासंबंधी प्रश्न पडतो. आज मी तुम्हाला भाज्या खरेदी करताना काय काळजी घ्यावी यासंबंधी काही टिप्स सांगणार आहे. भाज्या खरेदी करतांना शक्यतो हिरव्यागार आणि ताज्या भाज्या खरेदी कराव्यात.

 0
भाज्या खरेदीसंबंधी टिप्स:

भाज्या खरेदीसंबंधी टिप्स:

आपण जेव्हा भाज्या खरेदी करायला जातो तेव्हा बऱ्याच जणांना चांगली भाजी कशी निवडावी यासंबंधी प्रश्न पडतो. आज मी तुम्हाला भाज्या खरेदी करताना काय काळजी  घ्यावी यासंबंधी काही टिप्स सांगणार आहे. भाज्या खरेदी करतांना शक्यतो हिरव्यागार आणि ताज्या भाज्या खरेदी कराव्यात.

 

१)आले:

आले खरेदी करतांना ते घट्ट,पांढरे तसेच रेषा नसलेले घ्यावे. तसेच सुकलेले आले घेऊ नये.

२)लसूण

लसूण खरेदी करतांना पाकळ्या टवटवीत असलेली लसूण घ्यावी. जर लसणीच्या पाकळ्या मऊ किंवा दबलेल्या असतील तर लसूण आतून पिवळी पडलेली व मेलेली असते.

३)मिरच्या:

मिरच्या खरेदी करताना शक्यतो हिरव्यागार व टवटवीत बघून घ्याव्यात.

  • a)लवंगी मिरच्या या काळपट हिरव्या रंगाच्या व बुटक्या असतात. तसेच त्या फार तिखट असतात.
  • b) जर तुम्हाला थोड्या कमी तिखट मिरच्या हव्या असतील तर काळपट हिरव्या रंगाच्या व लांब मिरच्या घ्याव्यात. रोजच्या स्वयंपाकासाठी या मिरच्या चांगल्या असतात.
  • c)पोपटी रंगाच्या व लांब मिरच्या या खूपच कमी तिखट असतात.त्यामुळे जे लोक कमी तिखट खातात किंवा ज्यांना मिरची खाल्ल्यामुळे त्रास होतो ते या मिरच्या खाऊ शकतात. यामुळे कमी त्रास होतो. तसेच आपण या मिरच्या लोणच्यासाठी सुद्धा वापरू शकतो.
  • d)बुटक्या व जाड मिरच्या या भरून वाळवण्यासाठी वापराव्यात.

 ४)कांदे

कांदे विकत घेतांना कांद्याचा शेंडा टोकदार आणि साल घट्ट व तुकतुकीत असणारे घ्यावेत. तसेच वजनाला जड असणारे कांदे चांगले असतात. जर कांडा शेंड्याला मऊ असेल तर तो आतून खराब असतो. तसेच ओले कांदे हे जरी स्वस्त असले तरी ते लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून ओले कांदे कधीही घेऊ नयेत. तसेच ओले कांदे चिरतांना जास्त झोंबतात.

५)बटाटे

बटाटे घेतांना जुने,पक्के व जड तसेच किंचित लालसर रंगाचे गुळगुळीत बटाटे घ्यावेत. डोळे खोल गेलेले तसेच हिरवट रंगाचे व कोंब फुटलेले बटाटे घेऊ नयेत. तसेच नवीन बटाटे लवकर कुजतात व ते चिकट असतात. त्याची सालेदेखील थोडी थोडी निघालेली असतात.

६)लिंबू

लिंबू घेतांना सुकलेले व डागाळलेले लिंबू घेऊ नये. पातळ सालीचे,पिवळे रसरशीत व तुकतुकीत लिंबू घ्यावे. सुक्या लिबांचा रस हा कडू असतो. 

७)काकडी

काकड्या घेतांना बेताच्या आकाराच्या,रसरशीत व पांढरट रंगाच्या बघून घ्याव्यात. पिवळसर रंगाच्या व खूप जाड काकड्या जून असतात. तसेच काकडी पूर्ण चिरण्याआधी एक कडेचे टोक खाऊन पहावे.कारण काकडी कडू असण्याची शक्यता असते.

८)टोमॅटो

टोमॅटो घेतांना रसरशीत,लाल गुलाबी रंगाचे,कडक व गोलसर आकाराचे घ्यावेत. हाताला मऊ लागणारे तसेच पचके टोमॅटो घेऊ नयेत,ते लवकर खराब होण्याची शक्यता असते.

९)गाजर

गाजरे घेताना ताजी रसरशीत,लाल गुलाबी रंगाची बघून घ्यावीत. ती गाजरे गोड असतात. orange रंगाची गाजरे हि किंचित उग्र असतात.

१०)बीट

बीट घेतांना ताजे,घट्ट व काळपट रंगाचे घ्यावे.

११)कोबी

कोबी पांढरट हिरव्या रंगाचा,घट्ट व रसरशीत बघून घ्यावा. कोबी घेतांना बाहेरून भोक नसलेला बघून घ्यावा. भोक असलेला कोबी आतून किडका असण्याची शक्यता असते. तसेच कोबी घेताना देठाकडे पाहून घ्यावा. खूप वेळा तो देठाकडे किडका असतो. तसेच पांढरा कोबी चवीला कमी आणि उग्र असतो.   

१२)फ्लॉवर

फ्लॉवर घेतांना घट्ट,पांढराशुभ्र जड व टवटवीत बघून घ्यावा. फ्लॉवरचा तुरा पिवळसर व सैल असल्यास आत किडी असण्याची शक्यता असते. फ्लॉवर घेतांना तुरे बाजूला करून व देठाकडून पाहावा. जर तो किडका असेल तर आपल्याला किडी दिसू लागतात.

१३)वांगी

वांगी घेताना ताजी,रसरशीत घट्ट व बाहेरून भोक नसलेली बघून घ्यावीत. भोक असलेले वांगे आतून किडके असते. तसेच काटेरी व पांढरी वांगी भाजीसाठी वापरावीत. छोटी वांगी भरलेली वांगी करण्यासाठी वापरावीत. लांब व जाड वांगी भरीत करण्यासाठी वापरावीत.

१४)सिमला मिरची

सिमला मिरची घेताना हिरवीगार,टवटवीत घट्ट व टवटवीत तसेच वरून भोक नसणारी घ्यावीत.

१४)लाल भोपळा

लाल भोपळा घेताना लाल रंगाचा घ्यावा. पिवळसर रंगाचा भोपळा घेऊ नये.

१५)दुधी भोपळा

दुधी भोपळा घेतांना हिरवा,लांब,बेताचा जाड व टवटवीत बघून घ्यावा. जास्त जाड असलेला दुधीभोपळा हा जून असतो.

१६)सुरण

सुरण हे आतून लाल व पिवळ्या रंगाचे असते. पिवळसर रंगाचा सुरण घ्यावा.  लाल रंगाच्या सुरणाला जास्त खाज असते.

महत्वाची प्रश्नोत्तरे

१)कांदे,बटाटे किंवा लसूण जर आपल्याला खूप काळ साठवून ठेवायचे असेल तर काय काळजी घ्यावी?

कांदे,बटाटे किंवा लसूण जर आपल्याला खूप काळ साठवून ठेवायचे असेल तर कपाटात न ठेवता मोकळ्या जाळीच्या परड्यात ठेवावे. त्यामुळे ते खूप दिवस चांगले राहतात.

 

२)मिरच्या टिकवण्यासाठी काय करावे?

मिरच्या टिकवण्यासाठी त्यांचे देठ काढून त्या वाळवून ठेवाव्यात आणि डब्यात भरून फ्रिज मध्ये ठेवाव्यात म्हणजे त्या खूप दिवस टिकतात. तसेच मिरच्या डब्यात भरण्याआधी तळाला पेपर घालावा.

 

मी केलेली एक छोटीशी कविता

 

जेव्हा तुम्ही करता खरेदी भाज्या

हव्या असतात त्या आपल्याला ताज्या

 

या टिप्स येतील तुमच्या उपयोगी

आहेत त्या भाज्या खरेदीसंबंधी

 

नेहमीच्या चुका करणे टाळा

सांगितलेल्या गोष्टी पाळा

तर आज मी तुम्हाला भाज्या खरेदी करतांना काय काळजी घ्यावी याबद्दल सांगितले. मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow