३० डिसेंबर | शेवटी करावी प्रार्थना एक ।

सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन

३० डिसेंबर | शेवटी करावी प्रार्थना एक ।

सकाळीं लवकर उठावें । भगवंताचें स्मरण करावें । हातपाय स्वच्छ धुवावे । मानसपूजा करावी॥ हृदयांत ठेवावें रामाचें ठाण। षोडशोपचारें करावें पूजन ॥ गंध, फूल करावें अर्पण । नैवेद्य करावा अर्पण । मनानें प्रसाद घ्यावा जाण ॥ शेवटीं करावी प्रार्थना एक । ‘रामा, तुला मी शरण देख॥ जें जें म्हटलें मी माझें । तें तें रामा तुझें ॥ आतां न गुंतवा माझें मन । रामा, मी आलों तुला शरण । वासना न उठो दुजी कांहीं । नामामध्यें प्रेम भरपूर देई ॥ सदा राखावें समाधान । जें तुझें कृपेवांचून नाहीं जाण ॥ नीतिधर्माचे आचरण । तुझे कृपेनें व्हावें जतन ॥ न मागणें आतां कांहीं । मी तुझ्यासाठीं जिवंत पाहीं । आतां द्या नामाचें अखंड स्मरण । देह केला तुला अर्पण ॥ रामा, जें जें कांहीं तूं करी । त्यांत समाधानाला द्यावें पुरी । आतां, रामा, एकच करीं । तुझा विसर न पडो अंतरीं॥ तुझे नामाची आवडी । याहून दुजें मागणें नसावें उरी ॥ हेंचि द्यावें मला दान । दीन आलों तुज शरण ॥ रामा, मला एकच द्यावें । तुझें अनुसंधान टिकावें ॥ नको नको ब्रह्मज्ञान । काव्य-शास्त्र-व्युत्पत्तीचें ज्ञान ॥ कामक्रोधाचे विकार । जाळताती वारंवार॥ आतां तारीं अथवा मारीं । तुझी कास कधीं न सोडीं ॥ आतां, रामा, तुझा झालों । कर्तेपणांतून मुक्त झालों॥ माझें सर्व तें तुझें पाहीं। माझें मीपण हिरोनि जाई ॥ रामा, आतां एकचि करीं । वृत्ति सदा राहो तुझेवरी ॥ रामा, मीं कोठें जावें ? । तुजवांचून कोठें राहावें ? ॥ देहबुद्धीची नड फार । ती करावी रामा तुम्ही दूर ॥ आजवर विषय केला आपलासा । न ओळखतां पडलों त्याच्या फांसा ॥ रामा, सर्व सत्ता तुझ्या हातीं। समाधान राहील अशी करावी वृत्ति ॥ तुझेजवळ मागणें दुजें नाहीं । हृदयांत तुझा वास अखंड राही । आतां तुझ्यासाठीं माझें जीवन । तुला तनमन केलें अर्पण ॥ तुमचे चिंतनीं लागावें मन । कृपा करा रघुनंदन ॥’ ऐसें करावें रामाचें स्तवन । रक्षणकर्ता एक भगवंत मनीं आणून ॥ ऐसें व्हावें अनन्य दीन । तात्काळ भेटेल रघुनंदन ॥

नामापरतें न माना दुजें साधन । जैसें पतिव्रतेस पति प्रमाण ॥ नामापरतें न मानावें सत्य । ज्यानें राम होईल अंकित ॥ हेच सर्व साधुसंतांचे बोल । कोणीही न मानावे फोल ॥ नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण । मनीं असो, नसो, करावें नामस्मरण ॥ नामाविण दुजें काहीं । सत्य सत्य त्रिवाचा नाहीं॥

३६५. नामाच्या संगतीं । ज्या व्यवहाराची प्राप्ति । तोच व्यवहार जाई । भगवत्सेवेप्रति ॥