उकडीचे मोदक

आपल्याला सर्वानाच माहित आहे की गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात. मग आपल्या घरात गणपती आल्यावर बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. पण बऱ्याच जणांना उकडीचे मोदक करायला थोडेसे अवघड जाते. म्हणूनच मी आज सहज सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवावेत याची माहिती सांगणार आहे.

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक

आपल्याला सर्वानाच माहित आहे की गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात. मग आपल्या घरात गणपती आल्यावर बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. पण बऱ्याच जणांना उकडीचे मोदक करायला थोडेसे अवघड जाते. म्हणूनच मी आज सहज सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवावेत याची माहिती सांगणार आहे.

साहित्य:

३ वाट्या सुवासिक तांदुळाचे पीठ ,३ वाट्या ओले खोबरे ,१.५ वाटी किसलेला गुळ,वेलची पावडर,पाणी ,तेल,मीठ

उकड काढण्याची कृती :

उकड काढताना सर्वप्रथम जेवढे वाटी पीठ घेतले असेल तेवढे वाटी पाणी गॅसवर ठेवावे. म्हणजेच जर ३ कप पीठ असेल तर तीन कप पाणी घ्यावे. त्यात थोडेसे मीठ आणि १ चमचा तेल किंवा तूप टाकावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तीन कप तांदळाचे पीठ टाकावे. नंतर ते पूर्ण मिक्स करावे आणि पाच मिनिटे झाकण ठेवून एक वाफ द्यावी. पाच मिनिटांनी ती उकड एका भांड्यात काढून थंड करून घ्यावी. उकड थंड होईपर्यंत सारण करून घ्यावे.

सारण करण्याची कृती :

सर्वप्रथम पॅन  गरम करत ठेवावा. त्यात १ चमचा तूप टाकावे. त्यानंतर त्यात तीन वाट्या ओले खोबरे टाकावे आणि जर तीन वाट्या खोबरे असेल तर त्यात १.५ वाटी किसलेला किंवा बारीक केलेला गूळ टाकावा. नंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. नंतर आवडीप्रमाणे त्यात वेलची पावडर टाकावी. नंतर ते व्यवथित सुकल्यावर गॅस बंद करून ते थंड होण्यासाठी एका बाऊलमध्ये काढावे.

त्यानंतर उकड छान मळून घ्यावी. आपण जेवढी छान उकड मळून घेतो तेवढे आपल्याला मोदक करायला सोपे जाते.उकड मळून घेतल्यावर सुद्धा प्रत्येक वेळी मोदक करताना थोडी उकड मळून घ्यावी. त्यानंतर हाताला थोडेसे तूप किंवा तेल लावून घेऊन एक गोळा घ्यावा. नंतर आपले दोन्ही अंगठे मधोमध प्रेस करून त्याची व्यवस्थित पारी  करून घ्यावी. मग त्यात मोदकाचे सारण घालून पारीच्या प्लेट्स करून घ्याव्यात किंवा काही जण आधी प्लेट्स करून मग त्यात सारण घालतात. तुम्हाला जे सोपे वाटेल ते करावे. मग अलगद प्रेस करून मोदक बनवून घ्यावेत. . त्यानंतर एका स्टिमर मध्ये १० मिनिटे पाणी गरम करत ठेवावे. नंतर त्यात  एक केळीचे पण ठेवून त्याला थोडेसे तेल लावून घ्यावे आणि सर्व मोदक ठेवावेत. सर्व मोदक १५ मिनिटे वाफवून घ्यावेत. अशा पद्धतीने आपले सुंदर रुचकर आणि आपल्या लाडक्या बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक तयार.

टीप - उकड जेवढी सॉफ्ट असेल तेवढे मोदक करणे सोपे जाते. उकड जर हाताला चिकटत असेल तर मोदक चांगले होत नाहीत. म्हणून उकड काढताना काळजी घ्यावी.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

१)उकड काढताना कोणत्या  तांदुळाचे पीठ घ्यावे?

उकडीच्या मोदकांसाठी शक्यतो रेडिमेड सुवासिक तांदुळाचे  पीठ मिळते ते घ्यावे किंवा बासमती तांदुळाचे पीठ घ्यावे.

२) उकडीच्या मोदकांसाठी गुळाऐवजी साखर वापरली तर चालेल का?

होय,आपण गुळाऐवजी साखर वापरू शकतो. परंतु गुळ घालून बनवलेले मोदक जास्त चविष्ट आणि पौष्टिक होतात म्हणून शक्यतो गुळ घालावा.

३)हाताने बनवलेले मोदक चांगले की मोदक पात्रामधील मोदक चांगले?

हाताने बनवलेले मोदक हे केव्हाही चांगले. परंतु जर एखाद्याला मोदक बनविता येत नसतील तर मोदकपात्राचा उपयोग करू शकतो.

मी केलेली एक छोटीशी कविता

मोदक बनवा उकडीचे

आहेत बाप्पाच्या आवडीचे

 

बाप्पाबरोबरच तुम्हीही घ्याल  आस्वाद

चाटूनपुसून स्वच्छ होतील हात

 

असो संकष्टी वा अंगारकी

मजा मग साऱ्या पंगतीची

 

उकडीच्या मोदकांची गोष्टच  न्यारी

अशी मेजवानी सर्वानाच प्यारी

तर आज मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे बनवावेत  याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली मला खात्री आहे की या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.